अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम अटकेत

गुहागर येथील घटना

गुहागर:- गुहागरमध्ये क्रौर्याचा कळस गाठणारी आणि समाजमन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नराधम प्रितेश सुर्वे (वय २९) याने एका अल्पवयीन मुलीला गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर नेऊन बळजबरीने मद्य पाजले आणि तिच्यावर दिवसभर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने तिला रात्री जबरदस्तीने लॉजवर देखील नेले. या घटनेने गुहागरमध्ये संतापाची प्रचंड मोठी लाट उसळली आहे.

मुलगी रात्रभर घरी परतली नाही म्हणून काळजीत पडलेल्या पालकांनी गुहागर पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार केली. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी मुलीच्या घरी परतल्यानंतर तिची अवस्था पाहून पालकांना मोठा धक्का बसला. मुलीच्या चौकशी अंती हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

गुहागर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी प्रितेश सुर्वे याला अटक केली आहे. या नराधमावर गुहागर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचाराच्या या गंभीर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.