खेड:- खेड तालुक्यातील शेल्डी, खालचीवाडी येथे २० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ४ लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेल्डी, खालचीवाडी येथील रहिवासी असलेले श्री. संतोष राजाराम आंब्रे (वय ५२) हे फिर्यादी आहेत. त्यांच्या घराला कुलूप असताना २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजल्यापासून ते २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या दर्शनी दरवाजाला लावलेले पितळी कुलूप धारदार हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजाही त्याच हत्याराने उचकटून तोडून टाकला.
कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. चोरीला गेलेल्या मालामध्ये सुमारे २० ग्रॅम वजनाचे जुने वापरते सोन्याचे ब्रेसलेट (किंमत १,६०,००० रुपये), सुमारे २५ ग्रॅम वजनाचा जुना वापरता सोन्याचा हार (किंमत २,००,००० रुपये), १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन (किंमत ५,४०० रुपये), ०६ ग्रॅम वजनाची एक सोन्याची जेन्टस अंगठी (किंमत २,७०० रुपये), ०४ ग्रॅम वजनाची एक सोन्याची लेडीज अंगठी (किंमत १,८०० रुपये), ०५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची नथ (किंमत ५०० रुपये), ०३ ग्रॅम वजनाची एक सोन्याची नथ (किंमत ५०० रुपये), तसेच रोख ६०,००० रुपये अशा एकूण ४,३२,००० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
फिर्यादी श्री. आंब्रे यांनी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.१६ वाजता खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), आणि ३०५ अन्वये गुन्हा (गु.आर.नं. ३६५/२०२५) दाखल केला आहे. पोलीस या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत असून, या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









