किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी शस्त्राने हल्ला

एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

मंडणगड:- मंडणगड तालुक्यात एका आनंदाच्या कार्यक्रमाला हिंसक वळण लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाणकोट-मंडणगड रोडवर एका नामकरण सोहळ्यासाठी जमलेल्या नातेवाईकांमध्ये अचानक वाद होऊन एका तरुणावर लोखंडी धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात दीपक रामचंद्र साळुंखे (वय ३०, रा. देव्हारे) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक साळुंखे हे आपली चुलत बहीण सोनल गणेश चव्हाण हिच्या मुलीच्या नामकरण सोहळ्यासाठी (बारसे) मंडणगड-बाणकोट रोडवरील कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. सोहळ्याचा आनंद सुरू असतानाच फिर्यादीच्या ओळखीचे आरोपी रोहिदास तुळशिराम पवार (वय ५०), अक्षय रोहिदास पवार (वय २५), पप्पू तुळशिराम पवार (वय ३०) आणि अरुणा रोहिदास पवार (वय ४०, सर्व रा. पालगड, ता. दापोली) हे त्या ठिकाणी आले. यावेळी आरोपींनी फिर्यादी दीपक याच्याशी जुन्या ओळखीचा किंवा अन्य कारणावरून नाहक वाद घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक चकमकीचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले आणि आरोपींनी दीपक यांच्याशी विनाकारण भांडण करून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

या झटापटीत आरोपींपैकी अक्षय रोहिदास पवार याने आपल्या जवळील कोणत्यातरी लोखंडी धारदार शस्त्राने दीपक साळुंखे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात दीपक यांच्या डोक्याला डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली असून घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत दीपक यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी तातडीने दखल घेतली. जखमी दीपक साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), १११(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही तक्रार २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता दाखल करण्यात आली असून, गुन्ह्याचा नोंद क्रमांक ६३/२०२५ असा आहे. आनंदाच्या कार्यक्रमात रक्ताचा सडा पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भर कार्यक्रमात तरुणावर शस्त्राने हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.