रत्नागिरी:- हातखंबा परिसरातील अवघड चढणीच्या रस्त्यावर टँकर पलटण्याच्या घटनांनी अक्षरशः सत्रच सुरू ठेवले असून, आजचा अपघात हा या महिन्यातील तब्बल तिसरा प्रकार असल्याची माहिती समोर येत आहे. वाहतूकदार आणि स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढवणाऱ्या या धोकादायक वळणावर आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला.
बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास, कीटकनाशक वाहून नेणारा टँकर अचानक पलटी झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपासानुसार, ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटा पडला. या वाहनात कीटकनाशक असल्याने दुर्घटनेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरात रासायनिक द्रव्याच्या गळतीचा धोका असल्याने अत्यंत दक्षतेने टँकर बाजूला करण्याचे काम सुरू ठेवण्यात येत आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे मार्गाच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी या वळणावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी यावेळी अधिक जोमाने पुढे आणली असून, प्रशासनाकडून तत्काळ पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









