ग्रामस्थांच्या तीन दिवसांच्या पाळतीनंतर वाहनचालक ताब्यात; पोलिसांकडून पुढील तपास सुरू
सावर्डे:- गावातून सुरू असलेल्या गुरांच्या चोरट्या वाहतुकीवर सावर्डे येथील गोरक्षकांनी तीन दिवस पाळत ठेवून मोठी कारवाई उघड केली आहे. मागील काही दिवसांपासून एकच नंबर प्लेट असलेली संशयित गाडी रात्रीच्या वेळी गोमाता घेऊन कोल्हापूरकडे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती.
या माहितीनंतर ग्रामस्थांनी सलग तीन रात्री पाळत ठेवत संशयित वाहनाचा मागोवा घेतला. आज पहाटे साधारण ३ वाजण्याच्या सुमारास शिंदे–आंबेरी परिसरात ही गाडी दिसताच ग्रामस्थांनी ती अडवून चालकाला ताब्यात घेतले. त्याची धुलाई केल्यानंतर कोल्हापुरात कत्तलीसाठी गुरे नेत असल्याचे कबूल केले. गाडीत दाटीवाटीने भरलेली गुरे होती. याबाबतची माहिती सावर्डे पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून वाहन जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत स्वरूप रविंद्र साळवी, ऋषिकेश खानविलकर, अजय जाधव, मिलिंद चव्हाण, महेश सोने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तत्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन वाहन, चालक आणि गुरे ताब्यात घेतली. याप्रकरणी आवश्यक तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
गावकऱ्यांची सतर्कता आणि पोलिसांचे तात्काळ सहकार्य यामुळे गावातून सुरू असलेली गुरांची चोरीची वाहतूक मोठ्या प्रमाणात रोखण्यात यश मिळाले आहे.









