रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक असताना, महायुतीमधील अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे वारे स्पष्टपणे वाहू लागले आहेत.
आज महायुतीकडून १५ उमेदवारांनी ढोल-ताशांच्या गजरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, अद्यापही एकूण जागांपैकी १७जागांवर महायुतीकडून अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे, सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल, याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.
आज अर्ज दाखल झालेल्या १५ जागांमध्ये भाजपला फक्त ६ जागांवर उमेदवारी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीमध्ये शिवसेनेच्या तुलनेत अत्यंत कमी जागा मिळाल्याने भाजपच्या अनेक निष्ठावंत आणि इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गेली अनेक वर्षे पक्षासाठी काम करूनही ऐनवेळी जागावाटपात अन्याय झाल्याची भावना या इच्छुकांमध्ये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व नाराज इच्छुक, ज्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळालेली नाही, ते ‘एबी’ फॉर्मची वाट न पाहता येत्या सोमवारी मोठ्या संख्येने आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोमवार, हा खऱ्या अर्थाने ‘बंडखोरांचा वार’ ठरण्याची चिन्हे आहेत.
प्रशासकीय माहितीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या रविवार देखील खुला ठेवण्यात आला आहे. मात्र, बहुतांश राजकीय घडामोडी आणि बंडखोरी ही सोमवारीच, अर्थात शेवटच्या दिवशीच होण्याची चिन्हे आहेत.
महायुतीतील या असंतोषाचा आणि बंडखोरीचा फायदा उचलण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज असल्याची चर्चा आहे. महायुतीतून उमेदवारी न मिळालेले किती नाराज इच्छुक ‘बंड’ करून अपक्ष म्हणून लढतात आणि त्यापैकी किती जण थेट महाविकास आघाडीकडे जातात, याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येत्या दोन दिवसांत होणाऱ्या या बंडखोरीच्या घडामोडी रत्नागिरीच्या नगरपालिकेची संपर्ण राजकीय समीकरणे बदलू शकतात.









