मंडणगड:- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून, कुंबळे बाजारपेठेत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ८२ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई गुरुवार, दिनांक ०६/११/२०२५ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास कुंबळे येथील बाजारपेठेत एका दुकानाच्या समोर करण्यात आली. मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सबंधदास प्रताप मावची यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी इम्रान फारुक देवरुखकर (वय २५, रा. कुंबळे मोहल्ला, ता. मंडणगड) आणि मोहम्मद जावेद जफीर अन्सारी (वय ३४, सध्या रा. कुंबळे, ता. मंडणगड, मूळ रा. मुझफ्फरपूर, जि. पटना, राज्य-बिहार) या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताबा-कबज्यात अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने गैरकायदेशीररित्या बाळगलेला संशयास्पद माल मिळून आला.
पोलिसांनी तपासणी केली असता, आरोपींकडे पाच छोट्या पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये हिरव्या-काळ्या रंगाचा, उग्र वासाचा पाला, फुले, काड्या आणि बोंडे असलेला गांजासदृश्य अंमली पदार्थ आढळला. पिशव्यांसहित या गांजाचे एकूण वजन ५५ ग्रॅम असून, त्याची किंमत अंदाजे २,५०० रुपये आहे. याव्यतिरिक्त, पोलिसांनी ८०,००० रुपये किमतीचे अन्य साहित्य आणि गांजासदृश्य अंमली पदार्थ असलेले एक काळसर, मातकट रंगाचे चिलम व एक लायटर असा एकूण ८२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाई दरम्यान, आरोपी क्रमांक ३, आतिक एजाज कोंडेकर (वय २२, रा. कुंबळे मोहल्ला, ता. मंडणगड), हा पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पळून गेला.
मंडणगड पोलिसांनी आरोपी इम्रान देवरुखकर आणि मोहम्मद अन्सारी यांच्याविरुद्ध दिनांक ०७/११/२०२५ रोजी रात्री १.४९ वाजता गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) च्या कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) प्रमाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७/२०२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या आरोपी आतिक कोंडेकर याचा शोध पोलीस घेत असून, या अंमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटचा अधिक तपास मंडणगड पोलीस करत आहेत. कुंबळे बाजारपेठेसारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे उघड झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.









