रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचाराची संबंधित यंत्रणांकडे तक्रार करणार

बाळ माने; रत्नागिरी शहरातील खराब रस्त्यासंदर्भात गंभीर आरोप

रत्नागिरी:-  शहरात २ नोव्हेंबर पासून परिवर्तन यात्रा सुरू आहे. या ‘परिवर्तन यात्रे’त उपनेते बाळ माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ६० किलोमीटरचे रस्ते पायाखालून तुडवले. या यात्रेत त्यांनी केलेल्या खराब रस्ता आंदोलन आणि खड्ड्यांवरील ‘पोलखोल’ करण्यात आली. रस्त्यांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची आपण संबंधित यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचे बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

​पत्रकार परिषदेत बाळ माने यांनी अत्यंत धारदार भाषेत प्रशासनावर आणि ठेकेदारांवर हल्ला चढवला. त्यांच्यासोबत मिहिर माने आणि विराज माने हे देखील उपस्थित होते. “दर सहा महिन्यांनी रस्ते खराब होतात, कोट्यवधी खर्च होतात, मग हे काय गौडबंगाल आहे?” असा थेट प्रश्न माने यांनी उपस्थित केला. ११४ कोटी रुपयांची कामे सामंत यांनाच देण्यात आली, ज्यात चार महत्त्वपूर्ण ‘मलानका’ रस्त्यांसह ११ रस्त्यांचा समावेश आहे. बाळ माने यांनी ४४ कोटी ४८ लाख इतक्या रकमेच्या अनियमिततेचा थेट आकडा पत्रकार परिषदेत जाहीर केला.

​नगरपरिषदेने ‘बिटुमिन चलन सदर केलेले नाही’ अशी नोंद केली आहे. “याचा अर्थ स्पष्ट आहे, रस्त्यात बिटुमिनचे प्रमाण कमी वापरून दर्जाहीन कामे दिली गेली असल्याचे बाळ माने म्हणाले. शासन निर्णयानुसार ब्युटुमिनची दर्जा तपासणी आणि ऑडिट झालेले नाही, तरीही बिल अदा केले गेले आहे. हा जनतेच्या सार्वजनिक निधीचा गैरवापर आहे!” असे माने यांनी ठणकावले. बाळ माने हे लवकरच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI), अंमलबजावणी संचनालय (ED), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या भ्रष्टाचारावर कारवाईची मागणी करणार असल्याचे माने यांनी सांगितले.