बोटीवरून पाण्यात पडून खलाशाचा मृत्यू

रत्नागिरी:- बोटीवर काम करत असताना पाय घसरून पाण्यात पडल्याने एका ४७ वर्षीय खलाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरविंद गोविंद नितोरे (वय ४७, रा. फुणगुस, थुळवाडी, ता. संगमेश्वर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

​अरविंद नितोरे हे सुरेश केशव धातकर यांच्या बोटीवर खलाशी म्हणून काम करत होते. सोमवारी (दि. १३ एप्रिल) रात्रीच्या सुमारास बोटीवरील दुसरे कामगार सखाराम मासेकर हे मालकांच्या घरी पाणी आणण्यासाठी गेले होते. पाणी घेऊन ते पुन्हा बोटीवर परतले असता, त्यांना अरविंद नितोरे तिथे दिसून आले नाहीत.

​अरविंद बोटीवर नसल्याची माहिती मिळताच मालक सुरेश धातकर यांनी तात्काळ बोटीवर धाव घेतली. सर्वत्र शोध घेऊनही ते न सापडल्याने, ते पाण्यात पडले असावेत असा संशय बळावला. त्यानंतर उभ्या असलेल्या बोटीच्या आजूबाजूला जाळे टाकून शोध घेण्यात आला. शोध मोहिमेदरम्यान अरविंद नितोरे हे जाळ्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले.

त्यांना तातडीने उपचारासाठी वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री ८:३० च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे (आमृ. क्रमांक १५/२०२६). घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.