विकलेल्या जमिनीचे पैसे न मिळाल्याने वृद्धाने घेतला गळफास; दोघांविरुद्ध गुन्हा

दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे राजवाडी येथे जयंत भागोजी दुबळे (वय ८०) या वृद्धाने जागा विक्रीत मिळायचे ४० लाख रुपये न मिळाल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरोधात दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

३० ऑक्टोबर रोजी सकाळी दुबळे यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती त्यांच्या नातवाने दापोली पोलिसांना दिली. तपासादरम्यान पोलिसांना घरात एक चिठ्ठी सापडली असून, त्यात दुबळे यांनी संदेश शंकर कदम आणि अमोल भालचंद्र गुरव (दोघे रा. हर्णे) यांनी जमीन विक्रीतील उर्वरित ४० लाख रुपये दिले नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

पोलिस तपासानुसार, दुबळे गेल्या दीड वर्षांपासून या व्यवहारातील शिल्लक रक्कम मागत होते. अनेकदा दोघांकडे जाऊनही पैसे न मिळाल्याने ते मानसिक नैराश्यात होते. शेवटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

या प्रकरणात दापोली पोलिसांनी संदेश कदम (४८) आणि अमोल गुरव (३९) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत. दरम्यान, रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले.