सोनसाखळीच्या हव्यासापोटी खून, तिघांना जन्मठेप

मंडणगड तालुक्यातील २०१७ मधील घटना

मंडणगड:- पैशाच्या हव्यासापोटी एका व्यक्तीचा खून करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी आणि त्याचे दोन फोन चोरल्याप्रकरणी तीन आरोपींना खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.हा खून मंडणगड तालुक्यात दि. ३१ नोव्हेंबर २०१७ रोजी झाला होता. अभिजित सुधाकर जाधव (२७, रा. गव्हे, ता. दापोली), नरेंद्र संतोष साळवी (२८) आणि अक्षय विष्णू शिगवण (२८, रा. बोंडिवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) अशी या आरोपींची नावे आहेत.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. चांदगुडे यांनी दिलेल्या निकालानुसार, आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३९२, ३९७, १२०(ब) व २०१ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास प्रत्येक कलमानुसार तीन महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे.

या खटल्यात सरकार पक्षाने एकूण ३२ साक्षीदार तपासले. मोबाइल लोकेशन, सीडीआर, एसडीआर, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे अहवाल, साक्षीदारांची साक्ष आणि घटनास्थळावरून मिळालेला परिस्थितीजन्य पुरावा यावरून आरोपी दोषी असल्याचे न्यायालयाने घोषित केले.
सरकारी पक्षातर्फे ॲड. मृणाल जाडकर यांनी युक्तिवाद केला. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अनिल गंभीर (मंडणगड पोलिस स्थानक), कोर्ट पैरवी अधिकारी उपनिरीक्षक हरिश्चंद्र पवार आणि महिला हवालदार वैशाली सुकाळे यांनी प्रकरण उकलण्यात मोलाची भूमिका बजावली.

मंडणगड येथील राजाराम बाळकृष्ण चव्हाण हे चालक असून, आरोपींनी त्यांना वडाप टाटा मॅजिक गाडीने टांगर येथे प्रवासी सोडण्याचे भाडे असल्याचे सांगून फसवून बोलावले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून दगडाने मारहाण करत खून केला. त्यानंतर गळ्यातील सोनसाखळी आणि दोन मोबाइल फोन चोरून मृतदेह पुलाखालील सिमेंट पाईपमध्ये फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.