लांजा:- तालुक्यातील इसवली-गुरववाडी येथे दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास कौटुंबिक वादातून एका सख्ख्या भावाने दुसऱ्या भावाला कोयत्याने मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. घरात साफसफाई करण्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद विकोपाला गेला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी जखमी झालेले संजय यशवंत गुरव (वय ५०, रा. इसवली गुरववाडी) यांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी प्रकाश सोनु गुरव (रा. इसवली गुरववाडी) याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही फिर्यादी आणि आरोपी हे सख्खे नातेवाईक असून, एकाच घरात विभक्त खोल्यांमध्ये राहतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री (१२ ऑक्टोबर रात्री ०९.३० वा.) घराच्या ओट्यावर भात झोडणीचे काम सुरू होते. यावेळी फिर्यादी संजय गुरव यांनी आरोपी प्रकाश गुरव याला झोपण्याची जागा साफसफाई करून ठेवण्यास सांगितले. याच गोष्टीचा राग आरोपीला आला. रागाच्या भरात आरोपीने घरातून कोयती आणून फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी संजय यांनी ती कोयती आपल्या डाव्या हाताने पकडली. आरोपीने कोयती जोरात ओढल्याने फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर जखम झाली. यानंतर आरोपीने फिर्यादीला लाथांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.
या मारहाणीत जखमी झालेल्या संजय गुरव यांनी तातडीने जखमांवर औषधोपचार केले. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी घटनेनंतर उशिरा, म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२५ रोजी लांजा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. लांजा पोलिसांनी आरोपी प्रकाश गुरव याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २०४/२०२५) दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.









