गुहागर:- गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका दोन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी बालकाला मृत घोषित केले, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुहागर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर तालुक्यातील पवारसाखरी भोगळेवाडी येथील संपदा समीर आलीम यांची प्रसूती २३ ऑक्टोबर २०२५ रोजी झाली होती. प्रसूतीनंतर संपदा आलीम या त्यांच्या दोन दिवसांच्या नवजात बाळासह गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होत्या.
दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हे नवजात बालक कोणतीही हालचाल करत नसल्याचे आई आणि कुटुंबियांच्या निदर्शनास आले. तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी बालकाची तपासणी केली असता, त्यांनी त्यास मृत घोषित केले.
या घटनेनंतर शैलेश हरिश्चंद्र शिगवण यांनी, त्यांची चुलत बहीण संपदा आलीम यांच्या नवजात मुलाच्या मृत्यूबाबत पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ३७/२०२५ अन्वये नोंद करण्यात आली आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम (BNSS) १९४ प्रमाणे या घटनेची नोंद घेण्यात आली असून, बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या अकस्मात मृत्यूमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.









