महिलेच्या अपघातप्रकरणी एसटी चालकासह वाहकावर गुन्हा

चिपळुणात चालत्या एसटीच्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर फेकली गेली होती महिला

चिपळूण:- गुहागर गणेशखिंड मार्गे रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अचानकपणे आपत्कालीन दरवाजा उघडून त्यातून प्रियंका विनोद कुंभार (३५, दहिवली-शिवदेवाडी) बाहेर फेकल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता घडली होती. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर डेरवण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणी एसटी चालकासह वाहकावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक नितीन भाऊराव सावळे, बाहक चांद नजीर शेख (दोघे-गुहागर आगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सविता सुभाष करंजेकर (३९, दहिवली खुर्द-कराडकरवाडी) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुहागर ते रत्नागिरी या एसटी बसमधून सविता करंजेकर व प्रियांका कुंभार या दोघी दहिवली खुर्द आंबाफाटा थांबा येथून सावर्डे येथे प्रवास करत होत्या. असे असताना वाहक चांद शेख याने आपत्कालीन दरवाजा बंद हा आहे की नाही याकडे दुर्लक्ष केले. तसेच चालक नितीन सावळे यानेही बेदरकारपणे चालवल्याने गाडी खड्ड्यात आदळून आपत्कालीन दरवाजा अचानकपणे उघडला. त्यातून प्रियांका कुंभार या बाहेर फेकल्या गेल्याने त्याच्या डोक्यास व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे.