खेड:- खेड तालुक्यातील लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने कोकरे महाराज यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असतानाच, आता आणखी एका अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचाराबाबत नवीन तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनंतर गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज, त्यांचे सहकारी आध्यात्मिक शिक्षक प्रितेश कदम, तसेच पीडित मुलीची आत्या या तिघांविरोधात खेड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ही घटना ता. १६ ऑक्टोबर २०२४ ते ता. १८ जून २०२५ या कालावधीत लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुलामध्ये घडली आहे.
पिडीतेने दिलेल्या जबाबानुसार, गुरुकुलामध्ये धार्मिक शिक्षण आणि साधनेच्या नावाखाली कोकरे महाराजांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेत शिक्षक प्रितेश कदम आणि रोहिणी वामन यांचा देखील सहभाग असल्याचे तिने सांगितले आहे. त्यावरून खेड पोलिसांनी या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील बी.एन.एस. कलम 64(2)(1), 65, 351(3), 3(5) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 चे कलम 4 व 8 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या नव्या तक्रारीमुळे लोटे गुरुकुल प्रकरणाला आता अधिक गंभीर आणि संवेदनशील स्वरूप प्राप्त झाले आहे. काही दिवसांपूर्वीच पहिल्या पिडीतेच्या तक्रारीनंतर कोकरे महाराज आणि शिक्षक कदम यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते व त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आता नव्या प्रकरणामुळे त्यांच्यावर अधिक कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, लोटे गुरुकुला मध्ये अनाथ, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण आणि आध्यात्मिक संस्कार दिले जातात असा दावा करण्यात येत होता. मात्र या आड लैंगिक शोषण आणि अमानुष वर्तनाचे प्रकार सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. स्थानिकांकडून आणि सामाजिक संघटनांकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची तसेच गृहमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.