Monday, May 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी परतीचा पाऊस अचानक दाखल; बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

परतीचा पाऊस अचानक दाखल; बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

रत्नागिरी:- रत्नागिरीत बुधवारी दुपारनंतर अचानक परतीचा पाऊस दाखल झाला. विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान केले. जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ मुसळधार पावसाच्या सरींनी जिल्ह्याच्या अनेक भागात हजेरी लावली होती. 

जिल्ह्यात सर्वत्र भात शेतीची कापणी सुरू आहे. याशिवाय अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावली सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी आहे. मात्र अचानक आलेल्या परतीच्या पावसाने बळीराजासह व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. बुधवारी दुपारी अचानक सुरू झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. दीपावली सणासाठी रत्नागिरी बाजारपेठ आकर्षकपणे सजली होती. व्यापाऱ्यांनी दिवाळीसाठी आवश्यक वस्तू आकर्षकपणे बाजारपेठेत मांडल्या होत्या. मात्र अचानक अवघ्या काही सेकंदात आलेल्या मुसळधार पावसाने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. आकर्षक कंदील, रांगोळी, पणत्या आणि इतर वस्तू विकण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने सजवली असताना अचानक आलेल्या परतीच्या पावसाने व्यापाऱ्यांचे नुकसान केले आहे. अनेक दुकानांमधील कागदी कंदील भिजून गेले तर काही ठिकाणी विक्री साठी ठेवण्यात आलेल्या रांगोळीचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे वस्तु सुरक्षित ठिकाणी ठेवताना व्यापाऱ्यांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. परतीच्या पावसात व्यापाऱ्यांचे नुकसान तर झालेच मात्र ग्राहकांच्या दिवाळी खरेदीच्या आनंदावर देखील विरजण पडले.

या शिवाय परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आधीच लांबलेल्या पावसाने अनेक भागात भातशेती कुजण्याचे प्रकार समोर आले. तर काही भागात भातशेती पडून त्याला पुन्हा लोंब्या फुटण्याचे प्रकार समोर आले. यातून सावरलेली भातशेती घरी घेऊन जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. शेतकऱ्यांनी भातशेती कापून ठेवलेली असताना परतीचा पाऊस दाखल झाला अन् शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखी वाढ झाली आहे.