जिल्ह्यात सर्व तपासणी नाके हटवले; ग्राम कृती दलाची जबाबदारी वाढली

रत्नागिरी:- राज्य शासनाने राज्यातील ई-पास रद्द केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी लागणारे ई-पास रद्द केले आहेत. जिल्ह्यातील सर्व तपासणी नाके हटवले आहेत. पण, बाहेरून येणाऱ्यांची तपासणी, त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी तहसीलदार स्तरावरील स्क्रिनिंग सेंटरला देण्यात आली आहे. तसेच स्क्रिनिंग सेंटरला न जाता थेट गावात जाणाऱ्या प्रत्येकाची माहिती देण्याची जबाबदारी ग्राम कृती दल व प्रभाग समितीची असणार आहे. 

जिल्ह्यात आंतरराज्य व आंतरजिल्हा हद्दीतील प्रवेश करणाऱ्या नागरिकांची परवाना तपासणी (ई-पास) व आरोग्य तपासणीसाठी उभारण्यात आलेले चेक पोस्ट नाके बंद करावेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाता येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरातील प्रभाग समित्यांची जबाबदारी वाढली आहे. 
 

तहसिलदार यांनी आपल्या तालुक्यात येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग सेंटर ला नोंद करावी. स्क्रिनिंग सेंटर च्या ठिकाणी आल्यानंतर ज्या व्यक्ती 55 वर्षावरील आहेत किंवा कोविड सदृश्य लक्षणे जसे सर्दी , ताप , खोकला , श्वसनाचा त्रास वगैरे लक्षणे आहेत किंवा ज्या व्यक्ती दुर्धर आजार ( मधुमेह , उच्च रक्तदाब , हृदयविकार वगैरे ) ग्रस्त आहेत अशा तिन्ही पैकी कोणत्याही बाबीसंबंधी व्यक्तीची ” अॅन्टीजेन किंवा आर.टी.पी.सी.आर ” उपलब्धते प्रमाणे तपासणी करावी . तपासणी अंती येणाऱ्या निकषाच्या आधारे संबंधीत व्यक्तींना आवश्यकतेनुसार संस्थात्मक किंवा अन्य ठिकाणी अलगीकरण, विलगीकरण, उपचारासाठी पाठविण्यात यावे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व वैदयकिय अधिकारी यांनी समन्वय करावा. तसेच जे प्रवाशी स्क्रिनिंग सेंटरला न येता परस्पर गावात जातील अशा व्यक्तींची माहिती स्क्रिनिंग सेंटर ला कळविण्याबाबत ग्राम, वाडी व नागरी कृती दलांची असणार आहे.