सोन्याचे दागिने, गॅससह साहित्याची चोरी; गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील खवटी – सतीचा कोंड येथे घरमालकिणीच्या घरी राहणाऱ्या भाडेकरू पती-पत्नीनेच तब्बल 2 लाख 4 हजार 700 रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत घरमालकीण अनिता दिपक शिंदे यांनी खेड पोलीस स्थानकात रितसर फिर्याद दाखल केली असून, संशयित पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिता शिंदे यांच्या घरी भाड्याने राहणारे आशिष तुळशीराम दोडके आणि स्वरूपा आशिष दोडके या पती-पत्नीने दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान ही चोरीची घटना घडवून आणली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा 15 ग्रॅम 880 मिली वजनाचा सोन्याचा ‘लक्ष्मीहार’, 40 हजार रुपये किंमतीची 5 ग्रॅम 320 मिली वजनाची सोन्याची अंगठी, आणखी 40 हजार रुपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तसेच 3 हजार 500 रुपयांची भांडी, 1 हजार 200 रुपयांचा एच.पी. कंपनीचा गॅस सिलेंडर आणि गॅस शेगडी, असा एकूण 2 लाख 4 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अनिता शिंदे यांच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी संशयित पती-पत्नी आरोपी आशिष तुळशीराम दोडके व स्वरूपा आशिष दोडके यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 301/2015 नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305 (क) आणि 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.