कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींकडून विवाहितेला मारहाण

रत्नागिरी:- पतीच्या मोबाईल काही मुलींचे नंबर मिळाल्याच्या रागातून झालेल्या वादातून पत्नीला पती आणि सासूने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा.सुमारास गयाळवाडी येथे घडली.

पती श्वेतांग प्रदिप वायंगणकर (31) आणि सासू प्रार्थना प्रदिप वायंगणकर (58,दोन्ही रा.विनायक बंगला गयाळवाडी,रत्नागिरी) या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात पत्नी निधा श्वेतांग वायंगणकर (27) हिने तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी पत्नी निधा ही पती श्वेतांगचा मोबाईल चेक करत होती. त्यावेळी तिला मोबाईलमध्ये काही मुलींचे फोन नंबर मिळून आले. यातून पती-पत्नींमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर पत्नी निधा ही घराजवळील वडापावच्या गाडीजवळ असताना त्यांच्यातील वादाचा राग मनात धरुन पती श्वेतांगने त्याठिकाणी जाउन निधाला लोखंडी साखळीने हातांवर,पायांवर पाठीवर मारहाण केली.

त्यानंतर निधाची सासू प्रार्थना हिने त्याठिकाणी येउन लाकडी बांबूने सुनेला दोन्ही हातांवर,पायांवर पाठीवर मारहाण केली तसेच पती श्वेतांगने पत्न्ाीला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पती आणि सासू विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1), 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.