देवरुखातील प्रसिद्ध सोने व्यावसायिकाचे अपहरण करून लुटले

देवरूख:- देवरूख-साखरपा मार्गावर बुधवारी रात्री उशिरा एका व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यापारी केतकर यांच्यावर हा दरोडा टाकण्यात आला. मोर्डे खिंडीजवळ त्यांचा ताबा घेत अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचे अपहरण करत त्यांना लुटले. त्यानंतर त्यांना वाटूळजवळ सोडून पोबारा केला. या घटनेने संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी रात्री, सोने व्यापारी केतकर साखरप्यातून देवरुखला परत येत असताना, मोर्डे खिंडीच्या निर्जन परिसरात काही अज्ञातांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर, त्यांना धमकावून त्यांचे अपहरण केले. दरोडेखोरांनी त्यांना लुटून त्यांच्याकडील ऐवज घेऊन पळ काढला. त्यानंतर, त्यांनी केतकर यांना वाटूळच्या दरम्यान सोडून दिलं.
या घटनेची माहिती मिळताच, केतकर यांनी तात्काळ देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने नाकाबंदी सुरू केली आहे. तसेच, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दरोड्याची पुढील चौकशी सुरू आहे.