मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. लांबलेल्या पावसाने भातशेती मात्र धोक्यात सापडली आहे.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात संततधार सुरूच आहे. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. सकाळ पासूनच पावसाने हजेरी लावली होती. दुपारच्या सत्रात काहीशी विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सूनने परतीची वाट धरली असून, त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून, रविवारी दुपारपासून अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने बळीराजा मात्र चिंतेत सापडला आहे. लांबलेल्या पावसाने अनेक भागातील भातशेती धोक्यात सापडली आहे. पावसाचा मुक्काम लांबल्यास भातशेती कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.