Monday, May 25, 2026
spot_img
Home गुन्हेगारी शांतीनगर खून प्रकरणातील संशयित शुद्धीवर

शांतीनगर खून प्रकरणातील संशयित शुद्धीवर

खूनामागील कारणाचा होणार उलघडा

रत्नागिरी:- शहरालगतच्या नाचणे शांतीनगर येथे आईचा खून करणारा संशयित शुद्धीवर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अनिकेत शशिकांत तेली. (२५, रा. नाचणे शांतीनंगर) असे संशयिताचे नाव आहे.

खूनाच्या घटनेनंतर अनिकेत याने चाकूने स्वतःच्या मनगटाच्या नसा कापल्या होत्या. तसेच विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनिकेत हा शुद्धीवर आला असून पोलिसांची खूनातील चाकू हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे.

अनिकेतने घरगुती वादातून आई पूजा शशिकांत तेली (५०) यांचा गळा चिरुन खून केला होता. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. खून केल्यानंतर बेफाम झालेल्या अनिकेतने चाकूने स्वतःच्या दोन्ही मनगटाच्या नसांवर वार केले होते. तसेच बाथरुमधील विषारी द्रवही प्राशन केले होते. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अनिकेतला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. अनिकेतची परिस्थिती गंभीर बनल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. अनिकेत हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने खून नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याचा उलगडा होवू शकला नाही. दरम्यान अनिकेत हा आता शुद्धीवर आल्याने घटनेच्या दिवशी नेमके काय घडले, कोणत्या करणातून खून करण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून तपासली जाणार आहेत. अनिकेतचे वडील शशिकांत तेली यांनी मे महिन्यात आर्थिक कारणातून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. घरात आर्थिक कारणातून वाद असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे खूनाच्या घटनेमागेही काही आर्थिक कारणे आहेत का, याची तपासणीही करण्यात येत आहे. अनिकेत हा सध्या रुग्णालयात असल्याने तपासकामात काही तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र लवकरच खून करण्यामागील कारणांचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.