गुहागर येथून निघाले अन् बेपत्ता कुटुंब सापडले गोंदवलेकर महाराजांच्या मठात

गुहागर:- मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अखेर पत्ता लागला आहे. ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे शिक्षक आपल्या पत्नी व मुलासह बेपत्ता होते. मात्र आज गुरुवारी (२८ ऑगस्ट) सकाळी ९.४० वाजता माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराज मठ परिसरात त्यांचा शोध लागला आहे.

चव्हाण गोंदवलेकर महाराजांच्या मठात दर्शनासाठी आले असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. त्यावेळी स्थानिकांनी त्यांना पाहून संबंधित अधिकाऱ्यांना व नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांशी त्यांचा दूरध्वनीवर संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याचे समजत आहे.

चव्हाण हे गुहागर तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ते आपल्या मूळ गावी, हिंगोलीकडे कुटुंबासह निघाले होते. मात्र, २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी चिपळूण परिसरात असताना त्यांचा अचानक संपर्क तुटला. मोबाईल बंद असल्याने कुटुंबाशी संवाद साधता आला नाही. यामुळे नातेवाईकांनी व स्थानिकांनी चिंता व्यक्त केली होती.

गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याने पोलिसांत हरविल्याची तक्रार नोंद झाली होती. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे शोधमोहीमही सुरू होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण होते. आज सकाळी मिळालेल्या या बातमीमुळे नातेवाईक, सहकारी शिक्षक आणि गावकऱ्यांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. त्यांचे सहकारी, नातेवाईक आणि प्रशासनाकडूनही त्यांचा सुखरूप शोध लागल्याची पुष्टी करण्यात आली आहे.