चिपळूणमधील तीन सेवा संस्थांत लाखो रुपयांचा अपहार
चिपळूण:- तालुक्यातील तीन विविध सहकारी सेवा सोसायट्यामध्ये लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या सचिवाला अखेर चिपळूण पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. योगेश प्रमोद भोबेकर असे अटक झालेल्या त्या सचिवाचे नाव आहे.
योगेश भोबेकर तीन सोसायट्यामध्ये सचिव म्हणून काम करत होता. कालुस्ते, मालदोली व भिले या तीन सोसायट्यांनाही अडचणीत आणले आहे. लेखापरिक्षक तसेच सहायक निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तिन्ही सोसायट्यांनी भेटी दिल्या असता तपासणीसाठी दप्तर उपलब्ध झालेले नाही. सहकार विभागाने या तिन्ही सोसायट्यांचे संचालक मंडळच बरखास्त केले आहे. मालदोली, भोम, भिले आणि कालुस्ते या चार सोसायट्यांमध्ये नियुक्त सचिवानेच सुमारे ५५ लाखांहून अधिक रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार गतवर्षी उघडकीस आला होता. या सोसायट्यांना दिलेले लाखो रुपयांचे कर्ज थकित राहिल्यानंतर सोसाट्यांची चौकशी झाली. सहायक निबंधक कार्यालयाने घेतलेल्या सुनावणीतही सोसायट्यांचे दप्तर गायब असल्याचा प्रकार उघडकीस
आला होता. भोम सोसायटीचे लेखा परिक्षण झाले असता सचिवाने सुमारे १७लाखांचा अपहार केल्याचे उघड झाले. उर्वरित कालुस्ते, मालदोली आणि भिले सोसायटीत योगेश प्रमोद भोबेकर सचिव म्हणून काम करीत असल्याचे सहायक निबंधकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यालयाने संबंधीत सचिवाकडील दप्तरचा ताबा घेण्यासाठी हालचाली सुरू ठेवल्या आहेत.
मालदोली येथील योगेश प्रमोद भोबेकर खाडीपट्ट्यातील वरील चारही सोसायट्यांमध्ये सचिव म्हणून काम करत होते. त्यांची नियुक्ती ही या सोसायट्यांनीच केलेली आहे. अनेक वर्षापासून काम करत असलेल्या भोबेकर यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कर्जदारांकडील थकित वसुलीची रक्कम भरणा न केल्याचे एप्रिल महिन्यात जिल्हा बँकेला आढळल्यानंतर त्यांनी भोबेकर यांच्याकडे विचारणा केली. यावेळी भोबेकर यांने ५५ लाखाची वसूल केलेली रक्कम वैयक्तिक कारणासाठी वापरल्याचे लेखी कळवले होते. दरम्यान भिले, मालदोली आणि कालुस्ते येथील तिन्ही सोसायट्यांच्या संचालकांना सहायक निबंधक कार्यालय अपात्र करीत त्या बरखास्त केल्या आहेत. या तिन्ही सोसायट्यांचे दप्तर उपलब्ध झाल्यानंतरच लेखा परिक्षण होणार असल्याची माहिती सहायक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.