मंडणगड:- खैरतोडीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तालुक्यात जमीनमालकांच्या संमतीशिवाय खैर चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कादवण येथील खैरचोरीचे प्रकरण ताजे असताना भिंगळोली येथील वीज महावितरण कंपनीचे पॉवरहाऊसचे परिसरातील खैराची दिवसाढवळ्या चोरी झाली. हा प्रकार २० ऑगस्ट रोजी उघडकीस आला आहे.
महावितरण कंपनीच्या मालकीच्या जागेतील खैराची चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले; मात्र पोलिस आल्याचे पाहताच खैराची तोड करणारे घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाले. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खैराची जमीनमालकांना न सांगताच परस्पर तोड करून खैराचा माल कोण व कोणाला पुरवत आहे, असा प्रश्न ‘या निमित्ताने उपस्थित झाला आहे. कादवण येथील गरीब शेतकऱ्यांचे ३५ खैर चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय परस्पर तोडून नेल्याने शेतकऱ्यांच्या चरितार्थाचे मुख्य साधनच त्याच्यापासून चोरून नेले. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर चोरीसंदर्भात कोणताही छडा लागलेला नसताना शासनाच्या संस्थेच्या मालकीच्या जागेतील खैरावरच चोरांनी हात टाकला आहे. या प्रकरणातही तक्रार दाखल होण्यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. खैरतोडीवरील निर्बंध शिथिल झाले असले तरी वाहतुकीसाठी परवाना आवश्यक आहे. वनविभागाकडे याकरता रितसर मागणी करावी लागते. कारखान्यात वनविभागाकडून वाहतुकीचे परवाने न घेता चोरून तोडलेला खैर कोणत्या कारखान्यात प्रक्रियेसाठी पोहोच केला जात आहे, याचा पोलिसांनी तपास करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. याचबरोबर वनविभागानेही खैराचे विनापरवाना वाहतुकीविरोधात कडक कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.