रत्नागिरी शहरात गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा तरुण सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करत असताना पोलिसांना रंगेहाथ सापडला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विनोद विश्राम कदम यांना रत्नागिरी रिमांड होम ते फणशीकडे जाणाऱ्या रोडवर एका आंब्याच्या झाडाखाली एका तरुणाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. अधिक तपासणी केली असता, हा तरुण दगडावर बसून गांजासारख्या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फहाद मुस्ताक पाटणकर (वय ३२, रा. ऑर्किड अपार्टमेंट, शिवाजीनगर, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले. त्याने बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस हवालदार विनोद कदम यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी फहाद पाटणकर विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.