रत्नागिरी:- रत्नागिरीतील तथाकथित आरजू कंपनी घोटाळ्यात फसवणूक झालेल्या ग्राहकांनी न्याय मिळवण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ही माहिती दीपराज शिंदे यांनी दिली.
गेले वर्षभर विविध प्रकारच्या मागण्यांसाठी फसवणूक झालेले ग्राहक प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत होते. ही केस वर्षभर चालू असून, त्यातील ३ आरोपींना पकडण्यात पोलिस प्रशासनाला यश आले; मात्र मुख्य आरोपीला अद्यापही पकडण्यात आले नाही. त्याला पकडावे आणि जे ग्राहक फसलेले आहेत त्यांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी विलास वामन सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीकडून फसवणूक झालेल्या जवळजवळ ५८७ ग्राहकांनी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. १५ ऑगस्टच्या उपोषणावर ते सर्व ठाम आहेत. हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयापुढे करत असल्याचे विलास सुर्वे आणि दीपराज शिंदे यांनी सांगितले.