ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल पाऊल
रत्नागिरी:- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन यांसारख्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांना अधिक प्रभावी करण्यासाठी ‘सरपंच संवाद’ नावाचे एक नवीन मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी जिल्ह्यातील सरपंचांना या ॲपचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. सी.आर. पाटील यांच्या हस्ते २२ एप्रिल, २०२५ रोजी या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या ॲपचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता आणणे, संवाद वाढवणे आणि नवनवीन उपक्रमांची देवाणघेवाण करणे हा आहे.
या ॲपद्वारे सरपंच आपल्या गावातील उत्कृष्ट कामे आणि यशोगाथा देशभरातील इतर सरपंचांसोबत शेअर करू शकतात. विविध विषयांवर प्रशिक्षण घेणे, बातम्यांची माहिती मिळवणे आणि ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळवणे यांसारख्या सुविधाही ॲपवर उपलब्ध आहेत. हे ॲप स्वच्छ भारत (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन या दोन्ही अभियानांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी डिजिटल साधन म्हणून काम करेल.
जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे ॲप तात्काळ डाउनलोड करून त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री. सागर पाटील यांनी केले आहे. यामुळे गावांचा विकास अधिक गतिमान होईल आणि ग्रामीण भाग स्वच्छ, सुजल व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करेल.









