चिपळूण:- ऑगस्ट २०२४ पासून ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत चिपळूण तालुक्यात शिरळ येथील जयभीम स्तंभाजवळ एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील जखमी व्यक्तीचे नाव मुंजा किशनराव भिंगारे (वय ३८) आहे. त्यांना काम करत असताना वारंवार मारहाण करण्यात आली, असा आरोप आहे. मुंजा भिंगारे यांना त्यांच्या हाताने, काठीने मारहाण करून शिवीगाळ व धमकी देण्यात आली, अशी तक्रार त्यांचा भाऊ अनिल किशनराव भिंगारे (वय ४०, रा. आर्वी, जि. परभणी) यांनी पोलिसांकडे दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी ही तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार, चिपळूण पोलिसांनी गुन्हा रजि. क्र. १७८/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३५ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी आरोपी म्हणून रामदास चंद्रकांत चव्हाण (वय ५२), सौ. संगीता रामदास चव्हाण (वय ४४), विशाल रामदास चव्हाण (वय २३) आणि सागर रामदास चव्हाण (वय २०) या चौघांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत. हे सर्व शिरळ येथील जयभीम स्तंभाजवळ राहणारे आहेत.
मुंजा भिंगारे हे आरोपींच्या घरी कामाला होते. याच कामादरम्यान, त्याला ही अमानुष मारहाण करण्यात आली, असे फिर्यादी अनिल भिंगारे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.