६५ हजारांचा गांजा, दुचाकीसह रोख रक्कम जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे. त्याच्याकडून ६५ हजार रुपये किमतीचा गांजा, ९६ हजार रुपये किमतीची दुचाकी आणि ३,१०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १,६४,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईची माहिती अशी की, रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार कारवाईचे आदेश देण्यात आले होते.
दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास, रत्नागिरी शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचला होता. या सापळ्यादरम्यान, रत्नागिरीतील कोकणनगर ते प्रशांत नगर या भागात गांजाची तस्करी करणारा इसम आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी सय्यद सत्तार सत्तारुल्ला जाधव (वय ३३, नांगणपाडा चाल, इस्लामपूर, तालुका इस्लामपूर, जिल्हा सांगली, सध्या रा. विक्रांत नगर, स्टेशन रोड, रत्नागिरी) पोलिसांनी या इसमाची तपासणी केली असता त्याच्याकडे ६९५.५ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्याची अंदाजे किंमत ६५,०००/- रु. असून, तस्करीसाठी वापरलेली दुचाकी (MH-12-MZ-8492) आणि रोख ३,१००/- रु. देखील पोलिसांनी जप्त केले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४०/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii)(A) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
या कारवाईत पो.उप.नि. अ.श. शिंदे, पो.हे.कॉ. पंकज चव्हाण, अभिजीत पळसुले, संजय पाटील, अनिल गावडे, अनिल पाळवे, सागर क्षीरसागर आणि संदीप ढवळे (फोटोग्राफी विभाग) आदी अधिकारी आणि कर्मचार्यांचा सहभाग होता. दरम्यान, “अंमली पदार्थांविरुद्ध पोलिसांचे धोरण ठाम असून, कोणतीही गय केली जाणार नाही. नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.









