नाणिज येथील चोरीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:- चोरीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विधी सेवा प्राधिकरणामार्फत चालणाऱ्या लोक अभिरक्षक कार्यालयाच्या ॲड. आयुधा देसाई यांनी आरोपीच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली.

जून २०२४ मध्ये नाणिज येथे दागिने चोरल्याच्या आरोपाखाली कैलास प्रकाश संसारे याच्यावर ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या घरातून दागिने चोरून नेले असा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला होता. याप्रकरणी विधी सेवा प्राधिकरणमार्फत चालवण्यात येणाऱ्या लोक अभिरक्षक कार्यालयाकडून मोफत वकील देण्यात आले होते.

विधी सहाय्यक ॲड. आयुधा अक्षय देसाई यांनी सदर आरोपीची बाजू न्यायालयासमोर परिणामकारकरित्या मांडली. सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. या केसमधील सरकार पक्षाचा एकही साक्षीदार फितूर नव्हता. परंतु बचाव वकिलांनी साक्षीदारांचा घेतलेला पक्षाच्या उलटतपास विचारत घेऊन तसेच साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती व पोलिसांच्या तपासकामातील त्रुटी आणि आरोपीला जाणीवपूर्वक त्रास देणेसाठी केलेली खोटी केस या सर्व बाबी ॲड. देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. या सर्वाचा विचार करून रत्नागिरी मुख्य न्यायदंडाधिकारी, श्रीम. ए. ए. पिंगळे यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.