देवरुख:- देवरुख तालुक्यातील आंबवली पाष्टेवाडी येथे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. येथील ग्रामस्थांना विहिरीतून आवाज आल्याने पाहिले असता विहिरीत बिबट्या दिसून आला. याची माहिती तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन विभागाच्या पथकाने पिंजऱ्यात बिबट्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
गणपत सूर्याजी पाष्टे रा. आंबवली पाष्टे वाडी यांचे घराच्या आवारात 3.5 फूट दगडी कठडा असलेल्या विहिरीत बिबट्या पडलेची बातमी संतोष पाले (रा. आंबवली) यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोचले. बिबट्याला पकडण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. सकाळी 9.30 वाजता पिंजऱ्यात सुरक्षित रित्या बिबटया घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी देवरुख यांचेकडून तपासणी करून सुरक्षितरित्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सदरची कार्यवाही विभागीय वन अधिकारी श्री. र. शी. भवर यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनपाल देवरुख श्री. सुरेश उपरे, वनरक्षक न्हानू गावडे, शर्वरी कदम, मिलिंद डाफळे यांनी पार पाडली. याकामी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळाले.









