रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला अलोरे शिरगाव पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार अलोरे शिरगाव पोलिसांनी पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी येथे छापा टाकून एका व्यक्तीला १४ हजार रुपये किमतीच्या ५८८ ग्रॅम गांजासह अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत पाटील यांना २७ जून २०२६ रोजी रात्री ९ वाजता गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी, ता. चिपळूण येथे एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे.
या माहितीच्या आधारे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार केलं. या पथकात पोहेकाँ/११९७ गव्हाणे, पोहेकाँ/१२२३ यादव, पोकों/३१८ जगदाळे, पोकों/१०२८ फडतरे, पोकों/२२९ माने, एस. एम. लोटे ग्रेड पोउपनि, पोहेकाँ/५०६ शेख, मपोकाँ/६९५ मुल्ला यांचा समावेश होता. दोन पंचांसह या पथकाने सांगितलेल्या ठिकाणी सापळा रचला.
या कारवाईदरम्यान, संजय राया खरात (वय ३९, रा. पोफळी टी.आर.टी. धनगरवाडी, ता. चिपळूण) याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून ₹१४,०००/- किमतीचा ५८८ ग्रॅम वजनाचा “गांजा” हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
संजय खरात विरोधात अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४६/२०२५ अन्वये गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कायदा कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) नुसार २८ जून २०२६ रोजी पहाटे ३:३८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री. नितीन बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. भरत पाटील आणि त्यांच्या पोलीस अंमलदार पथकाने केली आहे. या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या व्यवसायाला आळा बसण्यास मदत होणार आहे.