१२५ कुटुंबांना स्थलांतराचे आदेश
दापोली:- मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पाजपंढरी गावातील लोकांना दरडीचा व समुद्री उधाणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे १२५ कुटुंबांना स्थलांतरित होण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. दरडप्रवण क्षेत्रात येणाऱ्या या गावातील लोक सध्या भीतीच्या छायेखाली जगत आहेत.
गावकऱ्यांच्या मते, पावसाळ्याच्या काळात घरात राहणे धोकादायक बनले आहे. दिवसा घरात थांबावे लागते, तर रात्री झोपण्यासाठी सुरक्षितस्थळी जाण्याची वेळ येते. घरांवर दरड कोसळण्याची भीती असल्याने आम्ही जीव मुठीत घेऊन जगतोय, असे येथील एका रहिवाशाने सांगितले. प्रशासनाने घरे खाली करण्याचा आदेश दिला असला तरी जायचे कोठे, असा मोठा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे.
एकीकडे मुसळधार पावसामुळे दरडींचा धोका कायमस्वरूपी टांगता आहे. त्याचवेळी पावसाळ्यात समुद्र अधिक खवळलेला असतो आणि उधाणाची भरती अधिक मोठी येते. त्यामुळे त्याचाही धोका या ग्रामस्थांना आहे. त्यामुळे या गावातील १२५ कुटुंबांना आपली घरे सोडून स्थलांतरित होण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.
कायमस्वरूपी पुनर्वसन
पाजपंढरीतील परिस्थिती गंभीर आहे. मात्र, वर्षानुवर्षे ज्या घरात राहिलो, ते घर सोडून जायचे कोठे, असा प्रश्न या ग्रामस्थांसमोर आहे. ही समस्या दरवर्षीचीच असल्याने सरकारने आमचे कायस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थ करीत आहेत.