मुंबई-गोवा महामार्गावर कार अपघातात दोघे जखमी

कोंडमळा घाटातील घटना

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडमळा घाटात, सावर्डे येथे शुक्रवारी २० जून रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका कार अपघातात दोन प्रवासी जखमी झाले. भरधाव वेगाने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कार (क्रमांक MH01 ER 7028) वरील चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता गाडी हयगयीने चालवल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी मालाड वेस्ट, मुंबई येथील मीनाक्षी सचिन नेगी यांनी चिपळूण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पती आणि कारचे चालक सचिन नेगी (वय ४२) हे गाडी अतिवेगाने चालवत होते. कोंडमळा घाट उतरत असताना, मागून येणाऱ्या गाडीला साईट देत असताना अचानक ब्रेक लावल्याने गाडी घसरली आणि रस्त्याच्या मोरीखाली जाऊन अपघात झाला.

या अपघातात गाडीतील चिंद्र सिंग आणि मीना नेगी (दोघेही रा. मालाड वेस्ट, मुंबई) हे जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायदा कलम २८१, १२५(अ) आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे करण्यात आली आहे. या घटनेची पुढील चौकशी चिपळूण पोलीस करत आहेत.