रत्नागिरीत मनसेचा नगरपरिषदेवर धडक मोर्चा

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाच्या बेफिकी आणि निष्क्रीय कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज ‘गैरकारभाराची वरात’ नामक धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी १ वाजता नगरपरिषदेसमोर झालेल्या या मोर्चात शेकडो जागरूक नागरिकांनी सहभाग घेत आपला संताप व्यक्त केला.

शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, वेळेत न झालेले गटार बांधकाम, पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे प्रलंबित राहणे, अशा विविध समस्यांवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला. मुख्याधिकारी गारवे यांच्याशी याआधी संपर्क साधून शहरातील समस्यांचे सादरीकरण करून भेट मागण्यात आली होती. मात्र प्रशासनाने वेळ न देत दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मोर्चाचे नेतृत्व मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, महेंद्र गुळेकर आणि शहराध्यक्ष बाबय भाटकर यांनी केले. यावेळी शहर सचिव गौरव चव्हाण यांनी सांगितले की, “सतत स्थानिक अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अकार्यक्षमतेमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. पालकमंत्री विकास कामांसाठी आक्रमक असतानाही निधी असूनही कामे होत नसतील, तर जनतेचा रोष स्वाभाविक आहे.”

मोर्चादरम्यान नागरिकांनी विविध बॅनर, फलक आणि घोषणांद्वारे प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. नागरिकांनी रस्त्यांवरच पडलेले खड्डे, वाहून जाणारे गटारांचे पाणी, उघड्या नाल्यांची उदाहरणे देत आपल्या अडचणी मांडल्या.

शेवटी, मनसेच्या प्रतिनिधींनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि लवकरात लवकर कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या मोर्चामुळे प्रशासनाची झोप उडाली असून, येत्या काही दिवसांत शहरात बदल दिसून येतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.