चिपळूणमध्ये महिलेला मारहाण, विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- चिपळूण शहरातील श्रीकृष्ण स्नॅक्स सेंटरसमोर, पोलीस ठाण्याजवळच एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची आणि विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवार, ९ जून रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला त्यांच्या पती निलेश रघुनाथ कदम, नणंद आणि श्रीकांत कांबळे यांच्याविरोधात तक्रार अर्ज देण्यासाठी चिपळूण पोलीस ठाण्यात आल्या होत्या. अर्ज देऊन त्या पोलीस ठाण्याबाहेर पडल्यानंतर साक्षीदारांच्या गाडीत बसत असताना, गाडीशेजारी उभ्या असलेल्या श्रीकांत कांबळे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही, रा. चिपळूण) याने महिलेला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

महिलेने त्याला शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, त्याला राग आला. त्याने एका महिलेसमोरच पीडित महिलेच्या कानशिलात मारली. एवढेच नाही तर, त्याने महिलेच्या शरीराला चुकीचा स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. हा गुन्हा ९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी दाखल करण्यात आला आहे.