Wednesday, May 27, 2026
spot_img
Home राजापूर अणुस्कुरा घाटातील अपघात की घातपात? पोलिस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद

अणुस्कुरा घाटातील अपघात की घातपात? पोलिस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद

राजापूर:- लांजा येथील कौस्तुभ विजय कुरूप (वय ३०) याच्या मृत्यु प्रकरणी राजापूर पोलीसांनी अपघाती मृत्यु अशी नोंद केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीसांकडून सर्व बाजुने तपास सुरू असून गुरूवारी राजापूर पोलीसांनी घटनास्थळाचा विस्तृत पंचनामा केला असून आजुबाजुच्या परिसराची पहाणी केली आहे.

लांजा पोलीस स्थानकात मंगळवारी नापत्ता म्हणून तक्रार व नोंद असलेल्या कौस्तुभ विजय कुरूप (वय ३०) रा. लांजा याचा इरटीका कारसह मृतदेह बुधवारी अणूस्कुरा घाटात खोल दरीत आढळून आला होता. कौस्तुभ हा चालवत असलेली इरटीका कार व त्याचा मृतदेह घाटात आढळून आल्याने हा अपघात, घातपात की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. दरम्यान कौस्तुभ याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी शवविच्छेदन करून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून शोकाकुल वातावरणात त्याच्यावर लांजा येथे बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान या मृत्यु प्रकरणी प्राथमिक दर्शनी अपघात असल्याचे दिसून येत असल्याने राजापूर पोलीसांनी अपघात प्रकरणी गुन्हा नोंद करत अपघाती मृत्यु अशी नोंद केली आहे.

दरम्यान कौस्तुभ हा सोमवारी रात्री लांजा येथून घरात आदमापुर येथे भाडे आहे असे सांगून इरटिका गाडी घेऊन बाहेर पडल्याची माहिती पुढे आली आहे. अणूस्कुरा घाटातील पोलीस चौकीच्या सीसीटीव्ही फुटेच मध्ये त्याची गाडी २.२० च्या दरम्यान वर घाटात गेल्याचेही दिसून येत आहे. त्यानंतर त्याचा या ठिकाणी अपघात झाल्याचा पोलीसांचा कयास आहे.

या प्रकरणी तपास अधिकारी राजापूर पोलीस उपनिरीक्षक सतीश उबाळे यांनी गुरूवारी घटनास्थळी घाटात प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली व घटनेचा विस्तृत पंचनामा केला आहे. तर या परिसराचीही पहाणी केली आहे.

या प्रकरणी पोलीसांकडून सर्व बाजुंनी तपास सुरू असून सध्या तरी अपघात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलीसांनी काढला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक सुधीर उबाळे अधिक तपास करत आहेत.