पीडितेची पोलिस स्थानकात धाव, सासरा मोकाट
गुहागर:- तालुक्यातील देवघर येथे सुनेने आपल्या सासऱ्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलेने गुहागर पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, आरोपी सासऱ्याचे अश्लील वर्तन गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. कुटुंबीयांच्या हस्तक्षेपाने यापूर्वी एक बैठक घेऊन आरोपीकडून माफीनामा लिहून घेतला गेला होता. मात्र, या नंतरही त्याच्या वागणुकीत काहीच फरक पडला नाही. काही दिवसांपूर्वी घडलेल्या पुन्हा अशाच घटनेमुळे पीडित महिलेने अखेरीस पोलिसांत धाव घेतली.
घटनेच्या वेळी पीडितेचा पती रोजगाराच्या शोधासाठी मुंबईत होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपी सासऱ्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे.