चिपळुणात पादचारी महिलेला धडक देऊन चारचाकी चालक फरार

रत्नागिरी:- चिपळूण शहरातील आदर्श वस्त्र भांडार दुकानासमोर एका पांढऱ्या रंगाच्या ‘रेनॉल्ट क्विड’ गाडीने (एम.एच.०८/ए.एन.०५५६) पादचारी महिलेला धडक दिल्याची घटना १८ मे रोजी सायंकाळी ४.२५ वाजता घडली. या अपघातात महिला जखमी झाली असून, गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या दोन मुले आणि दोन बहिणींसोबत बाजारपेठेत खरेदीसाठी पायी निघाल्या होत्या. त्या चिंचनाका ते चिपळूण बाजारपेठेच्या दिशेने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालत असताना, आदर्श वस्त्र भांडार दुकानासमोर चारचाकी पांढऱ्या रंगाची ‘रेनॉल्ट क्विड’ गाडी अचानकपणे चालकाने भरधाव वेगाने चालवून त्यांना समोरून धडक दिली.
या धडकेमुळे फिर्यादी महिला रस्त्यावर खाली पडल्या. त्यांच्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांना मार लागून उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली. तसेच छाती, पोटाला, डाव्या पायाच्या अंगठ्याला आणि डाव्या हाताच्या तळव्याला मुका मार लागून त्या जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर संबंधित गाडीचा चालक घटनास्थळी न थांबता लगेच निघून गेला. चिपळूण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.