लांजा:- तालुक्यातील शिपोशी हनुमानवाडी येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला लोखंडी शिगाने मारहाण करण्यात आली. ही घटना ९ मे रोजी दुपारी १:३० वाजता घडली. याप्रकरणी लांजा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शांताराम शंकर झगडे (वय ६५) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, ते त्यांच्या जागेत उद्या वाळूची गाडी येणार असल्याने रस्ता साफ करत होते. त्याचवेळी आरोपी अजय तुकाराम झगडे (वय ४०) यांच्या पत्नीने त्यांना पाहिले आणि घरी जाऊन याबाबत पतीला सांगितले. फिर्यादी शांताराम हे घराच्या पाठीमागे लाकडे भरत असताना आरोपी अजय लोखंडी शिग घेऊन आला आणि त्याने शांताराम यांच्या डाव्या मांडीवर मारून त्यांना जखमी केले. तसेच, आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर शांताराम झगडे यांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अजय झगडे याला भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), २६२ आणि २७६(२) अन्वये अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.