रत्नागिरी:- महामार्गावरील निवळी ते सुतारवाडी येथे काल गॅस टँकर पलटी झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, टँकरचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी टँकर चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची तक्रार रिक्षाचालक संतोष चंद्रकांत सुतार (वय ४२, रा. निवळी बावनदी सुतारवाडी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात सायंकाळी दाखल केली.
तक्रारीनुसार, आरोपी विजय कृष्णराव इंगळे (वय ४६, रा. लोणी लव्हाळा, ता. मेकर, जि. बुलढाणा) हा त्याच्या ताब्यातील (एचआर ५५ एम २८१६) गॅस टँकर घेऊन जात असताना, त्याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे आणि अति वेगात वाहन चालवले. बावनदी सुतारवाडी येथील उतारावर आल्यावर टँकर पलटी झाला.
पोलिसांनी आरोपी विजय इंगळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.