पूर्ववैमनस्यातून कोंडगाव येथे वृद्धाचा खून

मुलीशी लग्न लावून दिले नसल्याच्या रागातून हत्या

संगमेश्वर:– स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्री 11 वाजता साखरपा कोंडगाव पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या सुभाष रामचंद्र काळोखे (73) या वृद्धाची पुर्ववैमनस्यातून डोक्यात दगडी जाते मारून हत्या करण्यात आली.

दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीने संशयित अभिजित भिकाजी पाटील (रा.नाचणे रोड,रत्नागिरी) याने हा खून पू्ववैमनस्यातून केलेला आहे असे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. सन 2012 मध्ये सदर आरोपी हा काळोखे यांच्या मुलीला लग्नाची मागणी करत तगादा लावला होता व सतत त्रास देत होता. त्यामुळे सदर आरोपीला काळोखे यांनी समज दिली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी केले होते. त्यामुळे या गोष्टीचा राग मनात ठेऊन मृत काळोखे एकटे राहत असल्याचा व ओळखीचा फायदा घेत रात्री डोक्यात घाव घालीत मारहाण केली. सदर फिर्यादी प्रमाणे देवरूख पोलीस स्थानक येथे भा. द वि. क 302 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.

हत्येनंतर आरोपी अभिजित हा स्वतः रत्नागिरी पोलिसांच्या स्वाधीन झाला. घटनास्थळी क्षेत्रीय पोलीस उपअधीक्षक श्री.साळोखे, पोलीस अधीक्षक सौ.निशा जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक श्री.तुषार पाचपुते व अन्य कर्मचारी करीत आहेत.