मालमत्तेच्या व्यवहारातून १ कोटी ८४ लाखांची फसवणूक; चांदोर येथील एकावर गुन्हा

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव साखरपा येथे मालमत्ता संपादनाच्या मोबदल्याच्या रकमेतील तब्बल १ कोटी ८४ लाख २ हजार २६० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदानंद रमेश सावंत (वय ५१, रा. बाईंगवाडी, कोंडगाव साखरपा) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी साजन बाळकृष्ण फटकरे (वय २९, रा. तळीवाडी, चांदोर, ता. जि. रत्नागिरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदानंद सावंत यांच्या मालकीची कोंडगाव साखरपा येथील घर नं. ६१३, ११४४ अ ब व क ही मालमत्ता रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ साठी संपादित झाली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आरोपी साजन फटकरे फिर्यादीच्या घरी गेला आणि त्यांच्या मालमत्तेचा मोबदला लवकर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्याने फिर्यादीकडून १८ कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या.

दरम्यान, फिर्यादीच्या खात्यावर त्यांच्या मालमत्तेचा मोबदला म्हणून २ कोटी ७७ लाख ५० हजार ४१६ रुपये जमा झाले. त्यानंतर आरोपी साजन फटकरे याने ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत फिर्यादीची परवानगी न घेता पूर्वी सह्या घेतलेल्या चेकवर रकमा भरून तब्बल १ कोटी ८४ लाख २ हजार २६० रुपये काढले. अशा प्रकारे आरोपीने फिर्यादी आणि साक्षीदारांची फसवणूक केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

देवरुख पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४६७ (बनावट कागदपत्र तयार करणे), ४६८ (फसवणुकीच्या उद्देशाने बनावट कागदपत्र वापरणे) आणि ४७१ (खरे असल्याचे भासवून बनावट कागदपत्र वापरणे) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या मोठ्या फसवणुकीच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.