मध्यरात्री घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

संगमेश्वर:- तालुक्यातील कोडीवरे मोहल्ला येथे एका महिलेच्या घरात मध्यरात्री अनधिकृतपणे घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री २.३० ते ३.३० च्या दरम्यान घडली. मात्र, यासंदर्भात तक्रार २५ एप्रिल २०२५ रोजी ००.१९ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.मफिद अल फरिद बोरकर (वय २२) आणि अल साहिल ऐजाज काळसेकर (वय ३४), दोघेही रा. कोडीवरे मोहल्ला, ता. संगमेश्वर, अशी आरोपींची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कुटुंबासोबत घरी झोपलेल्या असताना, त्यांना घराची कौले वाजल्याचा दोन ते तीन वेळा आवाज आला. त्यामुळे त्या किचनमध्ये जाऊन पाहिल्या असता, आरोपी क्रमांक १ मफिद बोरकर हा त्यांच्या घराची कौले काढून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यावर, घराबाहेर आरोपी क्रमांक २ अल साहिल काळसेकर याच्या धावपळीचा आवाज त्यांना ऐकू आला.

फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ आणि २ हे दोघेही दारू, चरस आणि गांजाचे व्यसनी आहेत. त्यामुळे ते कोणत्यातरी वाईट उद्देशाने त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते, असा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे.
संगमेश्वर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३१(२), ६२ आणि ६४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.