खेड:- २० एप्रिल २०२५ रोजी दुपारी ०३:१५ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील दिवाणखवटी रेल्वे स्टेशनच्या सिग्नलजवळ उभ्या असलेल्या ११००४ तुतारी एक्सप्रेस गाडीत चोरीची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०४(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सृष्टी प्रकाश चव्हाण (वय २८, रा. ३०२/४, मंगलमुर्ती कॉम्प्लेक्स, विचुंबे, पनवेल, जि. रायगड) या तुतारी एक्सप्रेसच्या एस ८ डब्यात सीट नंबर २१ वर झोपून प्रवास करत होत्या. गाडी दिवाण खवटी रेल्वे स्टेशनच्या सिग्नलजवळ थांबली असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या पाठीमागच्या खिडकीतून हात घालून त्यांच्या गळ्यातील सुमारे ४१ हजार रुपये किंमतीची ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसका मारून चोरली. त्यानंतर चोरटा रेल्वे पटरीवरून पळून गेला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, खेड पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया २० एप्रिल २०२५ रोजी १२:५७ वाजता पूर्ण झाली.