खेड:- तालुक्यातील आंबडस येथे एका व्यक्तीला आपल्या मुलीच्या दिरांना जाब विचारणे चांगलेच भोवले. १३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेत फिर्यादी सतिश नथुराम साळुंखे (वय ४४, व्यवसाय लोहारकाम, रा. घुत्राळी, हनुमंतवाडी ता. मंडणगड) यांना मारहाण झाली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतिश साळुंखे यांच्या विवाहित मुलीला तिचा दीर नितीन चव्हाण हा त्रास देत होता. त्यामुळे सतिश आणि त्यांची पत्नी १३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंबडस येथे मुलीला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी सतिश यांनी नितीनला ‘तू माझ्या मुलीला त्रास का देतोस?’ असे विचारले. या गोष्टीचा राग आल्याने आरोपी नितीन चव्हाण आणि संजय चव्हाण (दोघेही रा. आंबडस, ता. खेड) यांनी मिळून सतिश यांना लोखंडी सळीने डोक्यात आणि पायाला मारहाण केली.
या मारहाणीत सतिश साळुंखे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.