राजापूर:- तालुक्यातील तळगाव येथे जुन्या वादातून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी प्रताप संजय सावंत आणि संजय सावंत या दोघा भावांविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक मनोहर पांचाळ (५३, व्यवसाय सुतारकाम, रा. तळगाव सुतारवाडी) हे ०९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास माळ नाका येथे अजय लाड यांच्या दुकानातून घरी जात होते. त्यावेळी आरोपी क्रमांक १ प्रताप सावंत याने त्यांना थांबवले आणि आरोपी संजय सावंत याला फोन करून बोलावून घेतले.
फिर्यादी दिपक पांचाळ यांनी चार वर्षांपूर्वी प्रताप सावंत यांच्या आत्याच्या घराला स्लाइडिंग बसवण्याचे काम केले होते. त्यावेळी उरलेल्या काचांचे पैसे परत न दिल्याच्या रागातून प्रताप आणि संजय यांनी दिपक यांना शिवीगाळ केली आणि हाताने धक्काबुक्की केली. त्यानंतर प्रताप याने बाजूला पडलेल्या जंगली लाकडी काठीने दिपक यांच्या डोक्यात मागच्या बाजूला आणि पाठीवर मारले. त्याचवेळी संजय याने दिपक यांच्या कानाखाली मारली आणि पोटात ठोसा मारला. आरोपींनी दिपक यांना हिशोबात राहण्याची धमकी दिली आणि जास्त काही केल्यास उचलून नेण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी पोलिसांनी प्रताप संजय सावंत आणि संजय सावंत यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.