महिन्यात एकही बुकिंग नाही ; प्रतिसाद न मिळण्याची कारणे शोधण्याची गरज
रत्नागिरी:- जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आणखी काही वाटा खुल्या करण्याच्यादृष्टीने केरळच्या धर्तीवर हाऊस बोट प्रकल्प रत्नागिरीतील जयगड येथे सुरू करण्यात आला. चोविस तासाला 20 हजार आणि तीन तासाला 5 हजार भाडे, याप्रमाणे प्रभाग संघ हा प्रकल्प चालवत आहे. एक कोटी रुपये खर्च केलेल्या या प्रकल्पाला २० मार्चला महिना झाला, परंतु अजून एकही बुकिंग आलेले नाही. त्यामुळे मोठा डामडौल वाजवून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे तेरा वाजणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पर्यटन वाढीसाठी सिंधुरत्न विकास योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ४ आधुनिक बसेस आणि ५ अलिशान, आकर्षक हाऊस बोटी बांधण्यात आल्या आहेत. १ कोटी ३२ लाखाचा बसचा तर ५ कोटींचा बोटींचा हा प्रकल्प आहे. या पथदर्शी प्रकल्पाला महिला सक्षमीकरणाची जोड देण्यात आली आहे. बचत गटांच्या प्रभागसंघांच्या माध्यमातून या बसेस आणि बोटी चालविल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. कोकणाला निसर्गाने भरभरुन वर्धान दिले असल्याचे माणले जाते. केरळ प्रमाणे कोकणात पर्यटनाला प्रचंड वाव असलेल्या येथे पर्यटन रुजविण्यासासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. त्यापैकी हाऊस बोटींग हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. सिंधुरत्न योजनेतून या प्रकल्पाला निधी मंजूर झाला. त्यातून केरळच्या धर्तीवर रत्नागिरीतही हाऊस बोटींग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ५ कोटींचा हा प्रकल्प आहे. एक बोट १ कोटीची आहे, अशा ५ बोटी खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २ बेडरुम, एसी, नाष्ता, जेवण आदींची सुविधा आहे. जयगड ते दाभोळ असा खाडी जलमार्ग त्यासाठी निश्चित केला आहे. चिपळुण येथे मगर सफरचाही यात विचार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी तत्कालीन जिल्हा परिषद मुख्याधिकारी कीर्तिकीरण पूजार यांनी पुढाकार घेतला होता.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जयगड येथील एका हाऊस बोटींगचा शुभारंभ केला. बोट आकर्षक आणि अलिशान असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेला याबाबत विचारणा केली, असता धक्कादाय माहिती पुढे आली. गेल्या महिनाभरात या हाऊस बोटीला एकही बुकिंग आलेले नाही. एक बुकिंग आले ते अजून निश्चित नाही. सर्वसामान्यांना परवडेल असे भाडे हवे आणि या प्रकल्पाची अपेक्षित प्रसार आणि प्रचार न झाल्याचा हा फटका असल्याचे बोलले जात आहे.