रत्नागिरी:- कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. सध्या जिल्ह्यात 48 तीव्र कुपोषित बालके आहेत. त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे.
जिह्यात 0 ते 6 वर्षे वयोगटांतील 53,266 बालकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 537 बालके मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) आढळली. त्यातील 48 बालके तीव्र कुपोषित (सॅम) आहेत. या तपासणीत कमी वजनाची 651 बालके आढळली असल्याचे जि.प.महिला व बालकल्याण विभागामार्फत केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या बालकांना पोषण आहार पुरवठा करण्यावर जि.प.महिला व बालकल्याण विभागाने लक्ष केंद्रीत केले. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे वेळोवेळी सर्वेक्षण हाती घेतले जाते.
जिल्ह्यात दर सहा महिन्यांनी कुपोषित बालकांचा आढावा घेतला जातो. या बालकांना सकस आहार देण्यासाठी असलेली एनसीडीसी केंद्र सुरू करण्यात आली आहे. या बालकांना सकस आहार पुरवठा करण्यावर व त्या बालकांचे वजन वाढविण्यासाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने आवश्यक उपचारासाठी देखील नियोजनपूर्वक लक्ष देण्यात येत असल्याचे महिला व बालविकास विभागामार्फत सांगण्यात येत आहे.









